यवतमाळ - जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर खरेदी घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. व्यापाऱ्यांनी तब्बल 11 हजार 700 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस नोंदणी करून कापूस विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या नावावर असलेला 11 हजार 700 संशयित शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी थांबवली आहे. या संदर्भातील चौकशी आता सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांची नोंदणी करून टोकन पद्धतीने कापूस खरेदीला सुरवात झाली. नेमका याचाच फायदा व्यापाऱ्यांनी उचलला. या काळात व्यापारी शेतकऱ्यांकडूनचा कापूस अत्यंत कमी किंमतीत विकत घेऊन तोच माल सीसीआयला दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर चढ्या किमतीत विकण्याचा गोरखधंदा व्यापाऱ्यांनी सुरू केला होता.
सात बारा शेतकऱ्याचा मात्र, मोबाईल नंबर आणि बँकेचे खाते मात्र व्यापारी आपले दाखवायचे. असा गोरखधंदा या व्यापाऱ्यांनी सुरु केला होता. कापूस खरेदीत घोटाळा होतो आहे अशी शेतकऱ्यांकडून ओरड सुरु झाली होती. या संपूर्ण प्रकारात जिनिंग प्रेसिंगचे मालक, ग्रेडर आणि वरिष्ठ अधिकारी यांची मिलीभगत असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणे शक्य नसल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केेला होता. या संदर्भात शेतकरी नेत्यांनी आवाज उचलला. तेव्हा कुठे सरकारला जाग आली.
कोरोना लॉकडाउन काळात कापूस विक्रीकरिता यवतमाळ जिल्ह्यात एकूण 52 हजार शेतकऱ्यांनी आपली नावे नोंदविली आहे. यात व्यापारी आपला कापूस शेतकऱ्यांच्या नावावर विकत असल्याचे शेतकरी नेत्यांनी सरकारला लक्षात आणून दिले. तेव्हा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी याला आळा घालण्यासाठी घोटाळ्याची चौकशी सुरू केली. यात त्यांना बोगस 11 हजार 700 संशयित शेतकऱ्यांची नावे आढळून आली. यावर कारवाई करत त्यांनी या संशयित शेतकऱ्यांच्या नोंदी रद्द करुन उर्वरित शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी सुरू केली आहे.
लॉकडाऊनमध्ये झालेल्या या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने, सहकार प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी प्रत्येक तालुक्याच्या सहायक निबंधकाकडून याबाबत सर्वेक्षण केले. यात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर कुठली कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - मायबाप सरकार तुम्हीच मोबाईल द्या आम्हाला.. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित
हेही वाचा - कापूस खरेदीत तफावत; दारव्हातील जिनिंगवर जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे निर्देश