यवतमाळ - जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा वाढत आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील दहा दिवसात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जवळपास दीडशे रूग्ण या दहा दिवसातील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 476 पॉझिटिव्ह रुग्ण निघाले आहेत. यातील 324 रुग्ण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होऊन आपल्या घरी परतले आहेत. सद्यस्थिती जिल्ह्यात 139 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.
अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यापासून नागरिक बिनधास्त आहेत. घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर करत नाहीत. सामाजिक अंतर राखले जात नाही. दुचाकीने सुसाट फिरायला जाणाऱ्याची संख्या जास्त आहे. बाजारपेठ व दुकानांमध्ये नागरिक एकत्र गर्दी करत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. कोरोनाला कुणीही लाइटली घेऊ नये. या आजारावर अद्यापपर्यंत औषध न निघाल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे कळकळीची विनंती जिल्हाधिकारी सिंह यांनी केली आहे.