यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. अशा स्थितीत प्रशासकीय यंत्रणेने जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. तरंग तुषार वारे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार हे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या पार्श्वभूमीवर योग्य परिस्थिती हाताळत नसल्याचा आरोप जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केला आहे. या सर्व अधिकाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडे केली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. सध्या जिल्ह्यात दररोज 350 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. इतकेच नव्हे तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा देखील वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन संसर्ग प्रतिबंधांत्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश शासनाकडून जिल्हा प्रशासनला देण्यात आले आहेत. याचा आढावा केंद्रीय पथक आणि राज्य शासनाकडून घेतला जात आहे.
प्रशासकीय अधिकारी काम करत नसल्याची तक्रार
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी व्यवस्थित काम करत नसल्याचे आढळून आले आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा शल्यचिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी हे दैनंदीन होणाऱ्या आढावा बैठकीत उपस्थित राहून माहिती सादर करत नाहीत. तसेच कोरोना प्रतिबंधात्माक उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवणे, जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून, कोरोना रुग्णांचा शोध घेणे, जिल्ह्यात होणाऱ्या आरटीपीसीआर, अँटीजन टेस्ट बाबत माहिती सादर करणे या सारख्या कामांचा समावेश आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून सूचनांचे पालन होत नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
पोलीस प्रशासन सुस्त
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय-योजनेचा एक भाग म्हणून, जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात संचारबंदीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. मात्र तरी देखील नागरिक बाहेर फिरताना दिसून येत आहेत. काही ठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र आहे, मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अनेक जण मास्क घालत नाहीत. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई होणे अपेक्षीत आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान आता जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची विभागीय आयुक्त दखल घेऊन, कारवाई करणार का हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खासगी दवाखान्याचे डेथ ऑडीटच नाही
गेल्या काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथक समितीचे प्रतिनिधी डॉ. आशिष रंजन यांनी खासगी दवाखान्याचे डेथ ऑडीट करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. मात्र त्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने अद्यापपर्यंत खासगी दवाखान्याचे डेथ ऑडीटच तयार केले नसल्याचे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.