यवतमाळ - अवैध दारू विक्रीच्या भरवशावर मस्ती करणाऱ्यांची मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदा आणला जाईल. तत्पूर्वी संसदेत दूधवालाच निवडून जाणार, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वणी येथे हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यवतमाळात दूधवाला म्हणजेच हंसराज अहिर चालतील, मात्र, दारूवाला नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांना टोला लगावला.
अवैध दारू विक्री करून जमविलेला पैसा आता निवडणुकीत खर्च केला जात आहे. अशावेळी कायद्याची पळवाट शोधून काढणाऱ्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदा करून बंधन आणू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भात सिंचन रस्ते प्रकल्पाची ५० वर्षात झाले नाही त्यापेक्षा अधिक कामे ५ वर्षात झाली. विदर्भाचा विकास करायचा असेल तर देशात आणि महाराष्ट्रात विदर्भाचा विचार करणारे सरकार हवे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी यांना जबाबदारी दिली. हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवार या विदर्भाच्या नेत्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या. आम्ही विदर्भाला कमी पडु दिले नाही, असे ते म्हणाले.