यवतमाळ - महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तारूढ झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शिवसेनेने पूर्वीपासून सातबारा कोरा करण्याची मागणी लावून धरली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठोस काही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे, आता सातबारा कोरा करण्याची मागणी जोर धरत आहे. नवीन सरकारने सात-बारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेली मदत तोकडी आहे. त्यात वाढ करावी तसेच व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवावी. मागील काही वर्षांपासून शेतकरी संकटात आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. दुष्काळी मदत कमी प्रमाणात दिली जात आहे. पीक विम्याचा लाभ मिळत नाही, या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.