यवतमाळ - आरोग्य विभागात नोकरी लावून देतो म्हणून पाच जणांची फसवणूक करणाऱ्याला आर्णी तालुक्यातील देऊरवाडी गावातून नागरिकांनी बदडत आणून आवधुतवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांने पाच जणांना 20 लाखांना फसवले असल्याचे समोर आले आहे. रविद्र उर्फे रघू गावंडे (वय-60, रा- देऊरवाडी पूनर्वसन, ता - आर्णी) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे.
बनावट नियुक्ती पत्राच्या सहाय्याने केली फसवणूक -
रघू गावंडे याने दारव्हा शहरातील रेणूका शेळके यांच्या मुलाला आरोग्य विभागात नोकरी लावून देतो, म्हणून तीन लाख रूपये घेतले होते. काही दिवसांनी त्यांच्या मुलाला कुरिअरने नियुक्ती पत्र देखील प्राप्त झाले. दरम्यान, शेळके यांचा मुलगा नियुक्ती पत्र घेवून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे गेला. मात्र, त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला दिला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, हे नियुक्ती पत्र बनावट असल्याचे समोर आले.
पैसे परत करण्याचे दिले होते आस्वासन -
सहा महिन्यापूर्वी शेळके यांनी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी तत्कालीन ठाणेदार आणि पोलिस उपनिरिक्षकाने रघु गावंडे याला पोलिस ठाण्यात बोलावून घडलेल्या प्रकाराबाबत विचारपूस केली. त्यावेळी रविंद्र गावंडे याने पोलिसांसमोर कबूली देत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते.
घरात आढळले बनावट कागदपत्रे -
रघु गावंडे यांच्या घरी बनावट नोटा, पमाणपत्र घरात आढळली आहेत. फसवणूक झालेल्या पाचही जणांनी आर्णी तालुक्यातील देऊरवाडी गाठून रविंद्र गावंडे याला पकडले. यावेळी त्याच्या घरात पाचशे रूपयांच्या बनावट नोटा, दिव्यांग ओळखपत्र, रेल्वे भरतीबाबतचे फॉर्म, समाजकल्याण विभागातील कार्ड आदींसह विविध बनावट कागदपत्रे आढळून आली. ही कागदपत्रे अवधुतवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.
या पाच जणांची २० लांखांची फसवणूक -
दारव्हा शहरातील रेणूका शेळके यांच्या मुलाला आरोग्य विभागात नोकरी लावून देतो म्हणून तीन लाख रूपये घेतले. यवतमाळ शहरातील चांदोरे नगरातील सुधा वाघमारे यांच्याकडून आरोग्य विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून नोकरीसाठी पाच लाख घेतले. गिरी नगरातील आशिष बिडवाईत यांच्याकडून तीन लाख, तर वडगाव रोड परिसरातील ललीता उभाड यांच्याकडून तीन लाख, आणि यवतमाळमधील मयूर डवरे यांच्याकडून आरोग्य विभागात नोकरी लावून देतो म्हणून पाच लाख, अशा पाच जणांकडून रविंद्र गावंडे याने जवळपास 20 लाख रूपये घेतले. या प्रकरणी रघु गावंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद वागदकर यांचा मार्गदर्शनात सहाययक पोलीस निरीक्षक दर्शन दिकोंडवार करत आहेत.