यवतमाळ - वणी येथील रितिक घनश्याम पावडे ह्या विद्यार्थ्याने मस्कुलर डिस्ट्रॉफी हा असाध्य आणि दुर्धर आजार असताना देखील बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. दहावीत ६५ टक्के तर बारावीत ६९ टक्के गुण मिळवून त्याने त्याची जिद्द दाखविली आहे.
हजारो मुलांमध्ये एकाला मस्कुलर डिस्ट्रॉफी हा आजार जडतो. या जणुकीय आजारात संपूर्ण शरीरातील स्नायूंच्या पेशी व तंतू चेतनाहीन होत जातात. ज्याचा परिणाम सर्वप्रथम पायांवर होतो. नंतर हात निकामी होऊन उठणे बसणेही अशक्य होते. त्यामुळे अशा मुलांचे शिक्षण दुरापास्त असते. रितिक देखील चालू शकत नाही. त्याचे हात आणि पाय काम करीत नाही. कायम त्याला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागतो. ही अवस्था असूनही त्याने जिद्दीने बारावीची परीक्षा दिली.
आजारामुळे रितिक शाळेत जाऊ शकला नाही, शिकवणी वर्ग तर नाहीच. मात्र त्याला शिक्षणाची गोडी आहे, खूप शिकायचं अशी खूणगाठ मनाशी बांधून त्याने घरीच मन लावून अभ्यास केला. परीक्षेच्या वेळी व्हीलचेअरद्वारे तो परीक्षा केंद्रावर पोहोचाचायचा. अशा खडतर मार्गातून वाट काढत त्याने शालांत परीक्षेप्रमाणेच बारावीतही घवघवीत यश मिळवले. भविष्यात त्याला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असून त्याला संगणकाची देखील आवड आहे.