यवतमाळ - लॉकडाऊन काळाती वाढीव वीज बिलाविरोधात आज भाजपच्या वतीने यवतमाळमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने वीजबिलांची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला. लॉकडाऊन काळात नागरिकांना भरमसाठ बिले आली आहेत. या बिलात सुट देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र आता सक्तीने बिलाची वसुली करण्यात येत असल्याने, हे आंदोल करण्यात आल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.
सरकारला जागे करण्यासाठी बिलाची होळी
सामान्य नागरिक, लघुउद्योजक आधीच तणावाखाली होते. त्यातच नागरिकांना वाढीव वीजबिल देण्यात आले. आता हे वीजबिल भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. सरकारने या बिलांमध्ये सुट द्यावी, झोपलेल्या सरकारला जाग यावी यासाठी वीजबिलाची होळी करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
ऊर्जा मंत्र्यांना आश्वासनाचा विसर
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागरिकांना वीजबिलात सुट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता त्यांनी आपल्या भूमीकेवरून युर्टन घेतला आहे. नागरिकांना वीजबिल भरावेच लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऊर्जा मंत्र्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे. अशी प्रतिक्रीया आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.