यवतमाळ - जिल्ह्यातील लिंगटी येथील एका पोल्ट्रीफार्ममध्ये 569 कोंबड्यांचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. पुन्हा याच पोल्ट्री फार्मवरील 76 कोंबड्यांचा मृत झाला तर, आर्णी येथे 2 कावळे मृत्यू पावले. त्यामुळे लिंगटी आणि आर्णी येथे 10 किलोमीटरचा परिसरात अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रामटेके यांनी गावाला भेट दिली आहे. मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे.
मृत कोंबड्यांचा अहवाल येणे बाकी -
आर्णी तालुक्यात आठ दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर इंगोले (रा.जांब) यांच्या शिवारात आठ मोर मृत अवस्थेत आढळले होते. त्या अनुषंगाने वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने मृत मोरांचे आवाहल अकोला येथे तपासणी करिता पाठवले होते. त्या मोरांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला हे स्पष्ट झाले. अशातच पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी येथे पुन्हा एकदा 76 कोंबड्या मृत पावल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत पावलेल्या कोंबड्यांची संख्या 645 इतकी झाली आहे.
दोन कावळ्यांचा तडफडून मृत्यू -
आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील दोन कावळ्यांचा तडफडून मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनानंतर सध्या जिल्ह्यात 'बर्ड फ्ल्यू'चा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आर्णी परिसरातील दहा किलोमीटरच्या परिसरात अलर्ट घोषित करण्यात आला आहे.