यवतमाळ- शालेय पोषण आहारात तांदुळाची खिचडी कमी करुन विद्यार्थ्यांना ज्वारी आणि बाजरीची भाकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना गरमा-गरम भाकरीचा आस्वाद घेता येणार आहे. मात्र, या नवीन योजनेमुळे शाळेतील शिक्षक, स्वयंपाकी व मदतनीस यांची डोकेदुखी वाढणार असून तुटपुंज्या मानधनात भाकरी करण्यास त्यांनी विरोध केला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यामध्ये, विद्यार्थ्यांना तांदळाची खिचडी, मटकी, वटाणा, चना या कडधान्यांचा समावेश होता. मात्र, शासनाने विद्यार्थ्यांना अधिक पौष्टीक अन्न मिळावे, यासाठी या मध्यान्ह भोजनात बदल केला आहे. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना जेवणात ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून सर्वच शाळांना ज्वारी अन् बाजरीचा पुरवठा करण्यात येणार आहे.
सध्या सुरू असलेल्या शालेय पोषण आहारातच अनेक अडचणी येत आहेत. कधी तांदुळाचा पुरवठा नसतो, तर कधी खिचडी बनवणारा स्वयंपाकीच घरी असतो. यासह अनेक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागतो. मात्र, आता तर ज्वारी अन् बाजरीच्या भाकरींची उठाठेव करावी लागणार असल्याने शाळा व्यवस्थापन या निर्णयामुळे नाराज बनले आहे. एका शाळेत जर 100 च्यावर विद्यार्थी असले तर 100 भाकरी थापायला निदान 3 ते 4 तास लागणार असून तेही अडचण सरकारने समजावी, असे स्वयंपाकी व मदतनीस यांनी म्हटले आहे.
सरकारची योजना चांगली असून विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार मिळणार आहे. विद्यार्थ्यांनामध्ये आनंदचे वातावरण आहे. मात्र, शाळेला इंधनासाठीचा खर्च तुटपुंजा असून हा वाढणार असल्याने याबाबत सुद्धा सरकरने निर्णय घ्यावा, असे शिक्षकांनी म्हटले आहे. शासनाने विद्यार्थ्यांना भाकरी देण्याचा निर्णय घेतल्याने आता शाळांमध्ये मध्यान्ह भोजन बनविण्यासाठी महिलांचीच भरती करावी लागणार आहे. कारण, सध्या पुरुष स्वयंपाकीही हे भोजन बनवितात. मात्र, भाकरीची अट असल्यास ते स्वयंपाकी तयार होतील का? हाही प्रश्न आहे. तसेच, या स्वयंपाकींना देण्यात येणारे मासिक मानधनही खूप कमी आहे. त्यामुळे मानधन वाढविण्याची मागणीही ते करू शकतील. त्यामुळे शाससाने ही योजना राबवावी, पण यंत्रणाही स्वतंत्र उभारावी, असे शाळेतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.