यवतमाळ - साहित्यिक व लेखक भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत बंजारा समाजातील महिलांसदर्भात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे बंजारा समाज आक्रमक झाला असून, नेमाडे यांच्यासह प्रकाशकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
भालचंद्र नेमाडे यांच्या लिखाणामुळे देशातील बारा कोटी बंजारा समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महिला कोणत्याही समाजातील असो. ती पूजनीय आहे. आक्षेपार्ह लिखाण करणे चुकीचे आहे. नेमाडे यांच्या लिखाणाची कोणतीही शहानिशा न करता ज्ञानपीठ पुरस्कार समितीने ज्ञानपीठ पुरस्कार दिला. गुन्हा दाखल करून ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी बंजारा समाजाच्या विविध संघटनांनी केली आहे.
'वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ'
निवेदनाची दखल न घेतल्यास मोर्चा, धरणे, उपोषण असे विविध आंदोलन करून बंजारा समाज रस्त्यावर उतरेल. वेळ पडल्यास न्यायालयात जाऊन कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा देण्यात आला. यवतमाळ जिल्हाभरात बंजारा समाज बांधवांनी निवेदन देऊन संताप व्यक्त केला.