यवतमाळ - 'ऑडिओ क्लिप'चा वापर करून समाज माध्यमांवर बंजारा समाजाची बदनामी केली जात आहे. याबाबत संत सेवालाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्या सोमवारी (ता.15) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहरादेवी येथून निवेदन पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती बंजारा समाज समन्वय समितीचे डॉ. टी. सी. राठोड यांनी दिली.
आत्महत्या की हत्या? तपास सुरू
पूजाने महंमदवाडीतील हेवन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेतला होता. तेथे ती भाऊ आणि एका मित्रासह राहात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सर्वकाही सुरळीत चालू असताना तिने 7 फेब्रुवारीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. यात तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झालाय असं सांगण्यात येत आहे. परंतु, कसलाही त्रास नसताना पुण्यात इंग्रजी शिकण्यासाठी आली असताना पूजाने हे पाऊल का उचलले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ती कसली तरी ट्रीटमेंट घेत होती असेही सांगितले जात आहे. परंतु, ही ट्रीटमेंट नेमकी कशाची होती, हे अद्याप उघड झालेले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू एक कोडे बनला आहे.
11 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
दरम्यान, पूजाच्या मृत्यूसाठी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट नाव घेऊन संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत तब्बल 11 ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमधील संभाषण गंभीर असून त्याआधारेच संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे केली जात आहे.
या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे. तर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घ्यावा आणि स्कॅन करून अधिक माहिती मिळवावी. त्याआधारे दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. पंकजा मुंडे यांनी देखील ट्विट करत पूजाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल - उद्धव ठाकरे
दरम्यान, या सर्व प्रकारावरून सरकारवर चहुबाजूंनी टीका होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष होते. यावर बोलताना ते म्हणाले, या प्रकरणात व्यवस्थित चौकशी केली जाईल. जे सत्य आहे ते बाहेर येईल. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे, त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात येईल. सत्य लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये, यामध्ये जे सत्य असेल ते चौकशीअंती जनतेसमोर आले पाहिजे.