यवतमाळ - फुगेवाला...फुगेवाला...असा आवाज कानावर पडतो. त्यावेळी साहजिकच लहान मुलं आपल्या आईजवळ हट्ट करतात आणि त्यांचा हट्ट पुरवला देखील जातो. पण, कोरोना आला, लॉकडाऊन लागले आणि फुगेवाल्याचा आवाजच बंद झाला किंबहुना तो करावा लागला. त्यामुळे फुगेवाल्या काकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. आता फुग्यांचा व्यवसायच नाहीतर, जगायचं कसं? खायचं काय? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत.
पिंपळगाव येथील विठ्ठल पलकंटवार हे गेल्या २५ वर्षांपासून फुगेविक्रीचा व्यवसाय करतात. मशीनच्या सहाय्याने फुगे फुगवून ते सायकलवर एका लाकडी काठीला बांधतात. दररोज सकाळी ८ वाजता फुगे घेऊन विक्रीसाठी बाहेर पडतात. सायंकाळ होतपर्यंत गावात फुगेविक्री करायची आणि मिळालेल्या चार पैशांमधून घरात लागत असलेले सामान आणायचे. त्यावर उदरनिर्वाह करायचा. पत्नी देखील म्हातारी आहे. त्यामुळे तिच्याही औषधपाण्याचा खर्च त्यांना या चार पैशांवरच करावा लागतोय. पण, कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि काकांचा व्यवसायच ठप्प झाला. त्याकाळात उपासमारीची वेळ आली. कसेतरी दिवस काढले.
आता अनलॉक झाल्यानंतर व्यवसाय चालेल असे वाटत होते. त्यामुळे काका पूर्वीसारखेच फुगे घेऊन विक्रीसाठी बाहेर पडले. पण, कोरोनामुळे फुग्यांची विक्रीच होत नाही. चिमुकल्यांनी हट्ट केला तरी कोरोनाच्या भीतीमुळे आई-वडील त्यांचा हट्ट पुरवू शकत नाही. या लहान चिमुकल्यांच्या हट्टामुळे विठ्ठल काकांचे घर चालायचे. घरात चूल पेटायची. म्हातारीचा दवाखाना व्हायचा. पण, कोरोनामुळे फुग्यांची विक्रीच होत नाही. त्यामुळे विठ्ठल काकांना संसाराचा गाडा हाकणे कठीण होऊन बसले आहे. आता पुढे जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.