यवतमाळ - घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादरम्यान 12 बालकांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायजर पाजल्याची घटना घडली. या 12 बालकांना यवतमाळच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुरवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल केले.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. हे सर्व बालके 1 ते 5 वयोगटातील आहेत.
पोलिओचे अजूनही आवाहन कायम-
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 1995 पासून संपूर्ण देशभर नियमितपणे राबविण्यात येत आहे. तरीही पोलिओचे आव्हान पूर्णत: संपुष्टात आले असे नाही. महाराष्ट्रात 2010 मध्ये मालेगाव शहरात 4 व बीड जिल्ह्यात 1 असे एकूण 5 पोलिओ रुग्ण आढळले होते. यातील मालेगाव शहरातील 4 पोलिओ रुग्णांनी नियमित लसीकरणांतर्गत एकही लसीची मात्रा घेतली नव्हती. तर बीड जिल्ह्यातील रुग्ण हा स्थलांतरीत कुटुंबातील असल्याने त्याला पोलिओची लस मिळाली नव्हती. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनातर्फे सातत्याने पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जाते.
पोलिओ रविवार -
दरवर्षीप्रमाणे या वर्षी 31 जानेवारीला 'पोलिओ रविवार' किंवा 'पल्स पोलिओ लसीकरण दिवस' म्हणून साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम पुढचे तीन दिवस सुरु राहणार आहे.