यवतमाळ - महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांनी भरपावसात धरणे आंदोलन करत आपल्या हक्काची मागणी लावून धरली. 3 सप्टेंबर पासून पुकारलेल्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनात तालुक्यातील आशा कर्मचारी सहभागी झाल्या असताना, शासनाने तिप्पट मानधन वाढीचे तोंडी आश्वासन दिले. मात्र, कुठलाही शासन निर्णय न आल्याने आशा कर्मचारी संभ्रमात आहे. त्यामुळे त्यांनी रविवारी मारेगाव येथील जिजाऊ चौकात भरपावसात धरणे आंदोलन करुन जनतेचे लक्ष वेधले.
१० सप्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर विदर्भातील सर्व आशा कर्मचाऱ्यांनी धरणे दिले होते. त्यानंतर १३ सप्टेंबरला जिल्हा परिषदेसमोर मानधन वाढीसाठी धरणे देऊन शासनाचे लक्ष वेधले. मानधन वाढीचा शासन आदेश तातडीने न काढल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही आशा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा - जिल्हा क्रीडा विभागाचा प्रताप, तालुकास्तरीय शालेय स्पर्धेसाठी दिले दगडांनी भरलेले मैदान