यवतमाळ- तब्बल 90 खिसे असलेले दोन जॅकेट अंगावर परिधान करुन येथील वाढोना बाजारात दारू तस्करी सुरु होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही दारू तस्करी होत होती. त्याच तस्कराचा भांडाफोड जिल्ह्याच्या वडकी पोलिसांनी केला आहे.
हेही वाचा- पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प महत्वाचा - प्रकाश आंबेडकर
दारू तस्कर तस्करीसाठी वेगवेगळ्या शक्कल लढवितात. एका तस्कराने तब्बल 45-45 खिसे असलेले दोन जॅकेट अंगावर परिधान करीत त्यावर एक शर्ट घातला होता. सोबतच दुचाकीच्या पुढे मागे प्लास्टिक पोत्यात देशीदारुचे काही बॉक्स घेऊन तो रात्रीच्या अंधारात तस्करी करत होता. त्याचा भांडाफोड वडकी पोलिसांनी केला आहे. मात्र, काल गस्तीवर असलेल्या वडकी पोलिसांनी वाढोना बाजार गावजवळ दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला थांबवून चौकशी केली. त्याच्या जवळ प्रचंड प्रमाणात दारू सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले. त्याची चौकशी केली. तो दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात अनेक दिवसांपासून तस्करी करत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्याच्या जवळून पोलिसांनी 225 बॉटल देशी दारू आणि एक दुचाकी जप्त केली आहे. सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे. अशात एका दारू तस्कराकडे मोठा साठा सापडला आहे. मतदारांना प्रलोभीत करण्यासाठी दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारुचा वापर केला जात होता काय? याचा तपास वडकी पोलीस करीत आहे.