यवतमाळ - जून महिन्यापासून खरीप हंगामाला सुरुवात होते. त्यामुळे मे महिन्यापासूनच शेतकरी बियाणे तसेच खते आदी खरेदीला सुरुवात करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषिकेंद्र व इतर कृषी निविष्ठांची दुकानेही सकाळी 7 ते 11 सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत होती. मात्र, आता शासनाने ही दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात साडेचार हजारावर दुकाने -
जिल्ह्यातील 16 ही तालुक्यात कीटकनाशके, बियाणे व खते यांची साडेचार हजारावर दुकाने आहे. या दुकानांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण आणि कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रकारचे कृषी उत्पादने व साहित्याचा पुरवठा हा नियमितपणे चालू ठेवण्यात आला आहे. कृषी साहित्य व कृषी संबंधित उत्पादने यांच्या मालवाहतूक करिता कुठल्या प्रकारचे निर्बंध लागू असणार नाही.
शेतकऱ्यांनी काळजी घेऊन खरेदी करावी -
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी करतेवेळी स्वतःची काळजी घेऊन खरेदी करावी. दुकानात गर्दी न करता सामाजिक अंतर पाळावे, सॅनिटाईजर व मास्कचा नियमित वापर करावा. गर्दी होईल अशा दुकानात शक्य तर जाणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले.
हेही वाचा - आई वडिलांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत अडकलेल्या चिमुकलीच्या मदतीला धावल्या सुप्रिया सुळे