यवतमाळ - दिग्रस तालुक्यातील बचत गटाच्या माध्यमातून आमदार संजय राठोड यांच्या पुढाकाराने बचत गटाच्या महिलांनी अगरबत्तीचा उद्योग सुरू केला. नामांकित ब्रँड असल्याने या उद्योगाने अल्पावधीतच भरारी घेतली आहे. या उद्योगामुळे 200 महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नामांकित ब्रँड या नामांकित कंपनीसोबत करार करण्यात आला. महिलांना प्रोत्साहन देत दीड कोटी रुपयांचा निधी बांबू विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून दिला आहे.
दिग्रस तालुक्यात आणि शहरात कोणत्याही प्रकारचा मोठा उद्योग नसल्याने महिलांना शेती आणि इतर उन्हातील कामे करावी लागत होती. त्यांना नियमित रोजगार देखील मिळत नव्हता. अशावेळी माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड वनमंत्री असताना वनविभाग, बांबू विकास महामंडळ यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकित ब्रँड कंपनीसोबत करार करण्यात आला. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने एक कोटी 67 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून शंभर मशीनची खरेदी करण्यात आली. पाचशे महिलांना रोजगार मिळावा, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले. सुरुवातीला 20 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. यवतमाळ अगरबत्ती प्रकल्प दिग्रस येथील तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू आहे. दोनशे ते अडीचशे महिलांना नियमित रोजगार मिळत असून, दिवसाला एका महिलेला अडीचशे ते तीनशे रुपये प्रतिदिन प्रमाणे रोज पडतो. त्यामुळे महिलेच्या हाताला काम मिळाले आहे.