यवतमाळ - शेतात राहत असलेल्या एका कुटुंबीयाला दहा ते बारा दरोडेखोरांनी मारहाण करत लुटल्याची घटना उमरखेड येथे घडली आहे. यावेळी कुटुंबीयाच्या मदतीला आलेल्या युवकालाही दरोडेखोरांनी विहिरीत फेकून दागिने घेवून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ढाणकी गावापासून जवळच असलेल्या खरूस शिवारात संजय जिल्हावार यांचे शेत आहे. या शेतात सालगडी नागोराव वामण डहाके आपल्या कुटुंबीयासह राहतात. रविवारी रात्रीच्या सुमारास डहाके कुटुंबीय शेतातील घरात जेवण करत असताना अचानक दहा ते बारा दरोडेखेरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी दरोडेखेरांनी वामन डहाके यांना बेदम मारहाण करीत पैशांची मागणी केली.
यावेळी, डहाके याने 'मी सालगडी असल्याने माझ्याकडे पैसे नाहीत. जे काय आहे ते सोने घेऊन जा, परंतु मारहाण करू नका.' अशी विनंती दरोडेखोरांकडे केली. अशातच आरडाओरड करण्याचा आवाज परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या सालगड्याला ऐकू येताच त्याने घराच्या दिशेने धाव घेतली. त्याने दरोडेखोरांनी विरोध करण्याचा प्रयत्न करताच त्यांनी त्याला देखील परिसरातील विहिरीत फेकून दिले.
हेही वाचा - ब्रम्हपुरी तालुका पुराच्या विळख्यात; अनेक गावांचा संपर्क तुटला, बचावकार्य सुरु
दरम्यान, डहाके यांच्या पत्नीच्या अंगावर असलेले दोन मंगळसूत्र आणि कर्नफुले असा एकूण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून दरोडेखोरांनी पळ काढला. यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या डहाके याने गावकऱ्यांना घडलेला प्रकाराची माहिती दिली. गावकऱ्यांनी खरूस शेतशिवारात धाव घेत त्या दुसऱ्या सालगड्याला विहिरीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विजय चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी नागोराव डहाके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरोडेखोरांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.