यवतमाळ - विवाह सोहळा म्हटले, की खर्च, पाहुणे, बँड बाजा आलाच. यात दोन्ही कडील मंडळी खर्च करतात. यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 25 ते 50 नातेवाईक यांनाच विवाहासाठी परवानगी देण्यात आली. त्यातही असे दोन कुटुंब एकत्र आले ज्यात फक्त वधू-वरासह 12 जण. ना बँड, ना बारात, अवघ्या 135 रुपयात विवाह पार पडू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. अनोखा विवाह सोहळा नोंदणी पद्धतीने पार पडला आणि मूक-बधिरांच्या आयुष्यभराच्या गाठी जुळल्या.
नोंदणी पद्धतीने केला विवाह
वधू मंगला संजय श्रीरामजीकर ही यवतमाळ तालुक्यात येणाऱ्या अकोला बाजार कामठवाडा येथील रहिवासी आहे. तर वर राजेश बोरकर अमरावती येथील दस्तुरनगर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे दोघेही मूकबधीर आहेत. नातेवाईकांनी पुढाकार घेऊन हा विवाहप्रसंग जुळवून आणला. विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नातेवाईकांना न बोलावता मुलाकडील आई वडील, काका, काकू आणि मुलीकडील आई वडील, बहीण, भाऊ एवढीच मोजकी मंडळी उपस्थित होती. सर्व नातेवाईक नोंदणी कार्यालयात आले आणि केवळ 135 रुपये खर्च करून आयुष्यभराच्या गाठी बांधल्या गेल्या. विवाह सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च न करता साध्या पद्धतीने कार्यक्रम पार पडू शकतो हे बोरकर आणि श्रीरामजीकर परिवाराने दाखवून दिले आहे.