यवतमाळ- मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूंमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली होती. त्यामुळे, जिल्ह्यातील नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र, आज एकाच दिवशी ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुन्हा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पहावयास मिळाला.
जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आज मृत्यू झालेल्या ९ जणांमध्ये यवतमाळ शहरातील ६१ वर्षीय महिला, तर ६२, ६५, ६४ आणि ७२ वर्षीय पुरुष. तर यवतमाळ तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच, कळंब तालुक्यातील ५८ व ६४ वर्षीय पुरुष आणि वणी तालुक्यातील ९२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या ५६ जणांमध्ये ३३ पुरुष व २३ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या ८ हजारवर पोहोचली आहे. तर, सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ६७ हजार ८५ नागरिकांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये २०४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आयसोलेशन वॉर्डात २३२ जण आहेत. तर, जिल्ह्यात आतापर्यंत २८३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- मंजूर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी मनसेचे बेमुदत उपोषण