यवतमाळ - प्रतिकूल परिस्थितीत घरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन ज्या महिलांनी आपल्या मुलांना उच्च विद्याविभूषित केले, अशा आदर्श मातांचा राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सत्कार करण्यात आला. येथील सीतामंदीर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सीतानवमीला पार पडलेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शेतकरी महिला आघाडी, हनुमान देवस्थान ट्रस्ट व सीतामंदीर निर्माण समिती यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी स्वयंसिध्दा सीता पुरस्कार २०१९ च्या सत्कारमूर्तींची घोषणा करण्यात आली. यावर्षी या पुरस्कारासाठी ८ महिलांची निवड झाली आहे. हिराबाई वसंत काकुष्टे, (साक्री, जि. धुळे) सुमित्रा विजय राजा (घोन्सा, जि. यवतमाळ), गंगू गजानन जोरगेवार(राजमाता कोतवाली वार्ड), नलिनी हरीभाऊ डोहे (गडचांदूर, जि.चंद्रपूर) वैशाली वसंत हेपट व माया शंकर ताजणे, सत्यशिला चांगदेव साळवे (बामणी) आणि कमल श्रावण बारापात्रे (उसेगांव, जि. गडचिरोली) या ८ आदर्श मातांचा सन्मानचिन्ह, शाल, साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. स्व. शरद जोशी यांनी २१ लाख रुपयांची देणगी देऊन सीतामंदीराचा जिर्णोध्दार केला होता, त्याच परिसरात हा सोहळा घेण्यात आला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सरोज काशीकर, महिला आघाडीच्या माजी प्रांताध्यक्ष शैला देशपांडे, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष अनिल घनवट, महिला आघाडीच्या प्रांतीय अध्यक्षा गीता खांदेभराड, रंजना मामर्डे, उमरेड येथील सामाजिक कार्यकर्त्या जैबुनिशा दीदी, वैशाली येडे, जोत्स्ना बहाळे, सतीश दाणी, प्रज्ञा बापट, प्रज्ञा चौधरी, सरपंच राजु तेलंगे, बाळासाहेब देशमुख उपस्थित होते.