यवतमाळ - यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन या गावात 2003 पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र अजूनही थांबले नाही. आतापर्यंत गावात तब्बल तीस शेतकर्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. गावात आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री इतकेच काय तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, तत्कालीन राज्यपाल एस. एम. जमीर यांच्यापासून तर अनेक दिग्गज नेत्यांनी या गावाला भेटी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आश्वासन दिले. मात्र, शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही.
2003 ला झाली पहिली शेतकरी आत्महत्या
बोथबोडन येथे 26 जानेवारी 2003 रोजी विनोद राठोड या शेतकर्याने कर्जामुळे पहिली आत्महत्या केली. विलास राठोड यानेही 26 जुलैला आत्महत्या केली. आतापर्यंत गावात तीस शेतकर्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपविली आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे गावकरी 26 हा आकडा कर्दनकाळ मानत आहेत. विलास राठोड याने नुकतीच आत्महत्या केली. त्याच्याकडे पाच एकर शेती असून, यंदा पेरणीसाठी पैसा नसल्याने त्याची शेती पडीत राहिली. खासगी सावकार आणि बँकेचे असे एकूण अडीच लाखापर्यंतचे कर्ज होते. अशातच यावर्षी बँकेकडून कर्ज मिळाले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेत हा कटू निर्णय घेतला. मृत शेतकर्याच्या आई-वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. आता कुटुंबात केवळ पत्नी आणि दोन लहान मुले आहे. या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत देऊन जगण्यासाठी आधार देण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा - जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लशीला भारताकडून परवानगी, जाणून घ्या लशीचे वैशिष्ट्ये