यवतमाळ - यावर्षी ओल्या दुष्काळामुळे आधी शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले आहे. त्यामुळे जो कापूस निघणार आहे तो खरेदी करण्यासाठी राज्यात 124 कापूस खरेदी केंद्र दिवाळीच्या आधीच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कापूस पणन महासंघाचे(मुंबई) संचालक सुरेश चिंचोळकर यांनी दिली. दिवाळीच्या पर्वावर कापूस खरेदी सुरू होणार असल्याने कापसाचे दर पडले तरी किमान हमीभावाने कापूस विक्री करण्यात येणार आहे.
राज्यात 116 तालुक्यात 124 कापूस खरेदी केंद्र-
राज्यात 116 तालुक्यात 124 कापूस खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यात पणन महासंघाचे 50 तर सीसीआयचे 74 केंद्रावर ही कापूस खरेदी प्रक्रिया केली जाईल. यावेळी कापसाला सहा हजार 25 असा प्रति क्विंटल हमी भाव राहणार आहे. कुठल्याही शेतकऱ्याचा 12 टक्के पेक्षा जास्त मोईश्चर असलेला कापूस स्वीकारला जाणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी वाळवलेला कापूस घेऊन यावा. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर येताना बैलगाडी, ट्रॅक्टर किंवा चारचाकी वाहनातूनच कापूस घेऊन यावा, असेही आवाहन कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात 35 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन -
यवतमाळ जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. यातून किमान 35 लाख क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारात कापसाचे दर पडले तरी शासनाच्या हमी दर 6025 रुपये क्विंटल कापूस खरेदी करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदीत कळंब, यवतमाळ, पुसद, गुंज, आर्णी या पाच केंद्रावर ही कापूस खरेदी प्रक्रिया दिवाळीच्या पर्वावर सुरू केली जाणार आहे. यानंतर टप्याटप्याने ही केंद्र वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
हेही वाचा - कलम 370 हटल्याने काश्मीर घाटीत विकासाचे मार्ग खुले झाले - मोहन भागवत