वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, मास्कचा वापर न करता जिल्ह्यात फिरणाऱ्या 4 हजार 316 नागरिकांकडून मागील तीन महिन्यात 13 लाख 77 हजार 400 रुपये दंड वसूल केल्याची कारवाई वाशिम पोलिसांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. मात्र, नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याने ही कारवाई सुरू असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात वाशिम शहरात मागील काही दिवसात 22 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी काल(गुरुवार) दिवसभरात वाशिम शहरात 13 रुग्ण आढळून आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी अॅक्शन मोडमध्ये आहेत. त्यामुळे, आज सकाळपासूनच शहरातील प्रत्येक चौकात मास्क न वापरणारे व वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई व विनाकारण फिरणाऱ्यांना ताकीद देण्यात येत आहे.
पोलीसांनी वाशिम शहरातील मुख्य चौकात ही मोहिम राबवली. यावेळी अनेक दुचाकीस्वारांकडे वाहनाचे कागदपत्र नव्हते. तर, काहिंच्या चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल बांधलेला नव्हता, तसेच, काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत होते. पोलिसांकडून अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.