वाशिम - जिल्ह्यात नागरिकांच्या तपासणीसाठी फीवर क्लिनिक उभारले असल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, हे फीवर क्लिनिक उघडण्यासाठी जर डॉक्टरच उपलब्ध नसतील, तर नागरिकांनी कशी खबरदारी बाळगावी, हा प्रश्न मालेगावच्या रहिवाशांना पडला आहे. कारण, सकाळी नऊ वाजता उघडणारे हे क्लिनिक साडे दहा वाजून गेले, तरी उघडले नव्हते. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांनी खबरदारी म्हणून आपली तपासणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी केले होते. त्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी 'फीवर क्लिनिक' उभारण्यात आले आहेत. हे क्लिनिक सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मालेगावमधील फीवर क्लिनिक हे सकाळी साडेदहापर्यंत सुरूच झाले नव्हते. तेव्हा लोकांनी कशी खबरदारी बाळगावी, हा प्रश्न उभा राहिला आहे.