वाशिम - लग्नामध्ये नवरदेवाची गाडी म्हटले की आपल्याला सुंदर अशी फुलांनी सजवलेली आलिशान चारचाकी गाडी डोळ्यासमोर येते. मात्र, वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील एका रुग्णवाहिका चालकाने सर्व गोष्टींना फाटा देत स्वत:च्या लग्नात चक्क रुग्णवाहिकेत बसूनच वरात काढली.
कारंजा येथील गुरुदेव रुग्णवाहिकेचे चालक सुमेध बागडे यांचे आज लग्न होते. सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना नेहमीच मदत करणारे म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. आपल्या लग्नात सुमेध यांनी दुसरी चांगली चारचाकी वाहन न वापरता रुग्णवाहिकेलाच फुलांनी सजवले. ही रुग्णवाहिका वऱ्हाडी मंडळींसह रस्त्याने जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. सर्वसामान्य विचारांना फाटा दिल्यामुळे त्यांची ही वरात लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
नवरदेवाच्या गाडीबरोबरच इतरही रुग्णवाहिका वरातीत सहभागी झाल्याने ही आगळीवेगळी वरात बघण्यासाठी कारंजातील नागरिकांनी गर्दी केली होती.