वाशिम - जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ 2.25 टक्के असून, फक्त 9.01 टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात होत आहे.‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले असून आजपासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, निर्गमित केले आहे. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने नियमित सुरु राहणार आहेत.
काया होणार सुरू -
कोविड त्रिसूत्रीचे पालन होण्याच्या अनुषंगाने व दोन व्यक्तींमध्ये योग्य सामाजिक अंतर राहण्यासाठी सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. रेस्टॉरंट नियमित सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरू राहणार आहेत. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलिंग नियमित सुरु राहील. क्रीडासंबंधित बाबी नियमित सुरु राहतील.
या कार्यक्रमांना परवानगी -
सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ यांना सभागृह, हॉलच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने परवानगी राहील. लग्न समारंभ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत नियमित सुरु राहतील. अंत्ययात्रेला 20 व्यक्तींच्या उपस्थितीत मुभा देण्यात आली आहे. कोविड त्रिसूत्रीचे पालन न केल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत .