वाशिम - जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसार्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनाधारकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सर्व खासगी आस्थापनाधारकांनी ११ मार्च ते २१ मार्च या कालावधीत आपली तसेच आस्थापनेत कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अन्यथा २२ मार्चपासून संबंधित आस्थापना बंद ठेवावी लागणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १० मार्च रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व दुकानदार, भाजीपाला, फळे, दुध विक्रेते, सलून, जनरल स्टोअर, डेअरी, कापड दुकान, मेडिकल, पीठ गिरणी, किराणा दुकानदार, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, लॉज यासह इतर सर्व खासगी आस्थापनाधारक व या आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार यांची कोरोना चाचणी ११ मार्च ते २१ मार्च या कालावधीत करणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
येथे करता येणार कोरोना चाचणी
वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय, अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय व तुळजा भवानी मंगल कार्यालय यासह रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरूळपी, कामरगाव व अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालये, तुळजापूर (ता. मंगरूळपीर) येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, सवड (ता. रिसोड) येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह आणि जिल्ह्यातील सर्व २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे.