वाशिम - पंचनाम्यातील त्रुटीमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. वाशिम तालुक्यातील सुराळा, कोंडाळा, झामरे शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच पंचनामे अचूक होण्याच्या दृष्टीने त्यांनी यावेळी काही पंचानाम्यांची पडताळणी केली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर, गट विकास अधिकारी श्री. वानखेडे यांच्यासह महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे ग्रामस्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या व या योजनेत सहभागी न झालेल्या अशा सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी आपल्या क्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे अधिक गतीने करावेत. याकरिता तालुकास्तरीय अधिकारी व ग्रामस्तरीय अधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. तसेच पंचनामे करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक नुकसानग्रस्त पिकाची भरपाई शेतकऱ्याला मिळावी, यासाठी सर्व पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
सुराळा शिरावारातील विठ्ठल चौधरी यांच्या शेतातील कापणी केलेले सोयाबीन, गोपाल चौधरी यांच्या शेतातील कापूस पिकासह इतर शेतकऱ्यांच्या शेतांमधील कापणी झालेल्या व शेतात उभे असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी जिल्हाधिकारी मोडक यांनी केली. तसेच कोंडाळा झामरे शिवारातील नुकसानग्रस्त पिकांचाही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्तरीय अधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचे प्रमाण, झालेले पंचनामे आदी विषयी माहिती घेतली.