वाशिम - काँग्रेसकडून राज्यातील उमेदवारांच्या नावांची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित झनक यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच रिसोड मतदारसंघात शिवसेनेने माजी जिल्हा परिषद सभापती विश्वनाथ सानप यांना उमेदवारी घोषित करीत एबी फॉर्म दिला आहे. रिसोड मतदारसंघावर शिवसेनेने केलेला दावा या निमित्ताने मान्य झाल्याचे दिसते. मात्र, भाजपचे माजी आमदार विजय जाधव अद्यापही उमेदवारी मिळावी यासाठी संघर्ष करत असल्याची चर्चा होत आहे.
हे ही वाचा - मनसेची पहिली यादी जाहीर, वरळीतून उमेदवारीचा निर्णय राज ठाकरे घेतील
रिसोड मतदारसंघावर पूर्वीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व आहे . २०१४ च्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस मध्ये झालेल्या लढतीत काँग्रेस उमेदवार अमित झनक यांनी भाजपाचे तेव्हाचे उमेदवार माजी आमदार विजय जाधव यांचा तब्बल १६ हजार ७०८ मतांनी पराभव केला होता . यावेळी मात्र परिस्थिती वेगळी असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेऊन उमेदवारीवर दावा ठोकला असून वंचित कडून त्यांची उमेदवारी जाहीरही झाली आहे. त्यामुळे आमदार अमित झनक यांच्यासमोर वंचित चे मोठे आव्हान उभे ठाकले आहे .
हे ही वाचा - भाजप आमदार चरण वाघमारे यांनी कारागृहातूनच भरला उमेदवारी अर्ज