वाशिम - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातुन प्रहार संघटनेकडून वैशाली येडे निवडणूक लढणार आहेत. केमिस्ट भवन येथे लोकसभेसाठी सोमवारी प्रहारचे उमेदवार वैशाली येडे यांचा अर्ज भरण्यात येणार आहे. पवित्र मतदान व्हावे, म्हणून रक्तदान करून अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक असलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा वैशाली येडे प्रहारकडून मैदानात उतरणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वाशिम येथे कार्यकर्ता सभेसाठी बच्चू कडू आले होते. २७ मार्चला प्रचाराची सुरुवात देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटून करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
पार्थ पवारचे भाषण मी ऐकले वडिलांचे नाव घेताघेता ज्याला हुचक्या आल्या, असा उमेदवार या देशात होऊ शकतात. वडिलांचा आणि आजोबाच्या पुण्याईवर उभे राहणाऱ्यांपेक्षा आमचे उमेदवार निश्चितच चांगले आहेत. वैशालीताईंनी दुःख जवळून पाहिले आहे. स्वतःचा नवरा गेलेला आहे, घर चारहीकडून पडलेलं आहे आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. हे दुःख संसदेपर्यंत नेण्याचे काम हे उमेदवारी करतील. वैशालीताईं नक्कीच चमत्कार घडवतील. सगळ्याचे गणित मोडून काढून ते संसदेत पोहोचतील असे बच्चू कडू म्हणाले.