वाशिम - जिल्ह्यातील कोंडाळा झामरे येथून घरासमोर उभी असलेली दुचाकी भर दिवसा चोरट्यांनी लंपास केली होती. या घटनेची दखल घेत ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवित दोन चोरट्यांना मुद्देमालासह अटक केली आहे. अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील कोंडाळा झामरे येथील भीमराव गणपत लबडे यांनी रविवारी दुचाकी चोरी झाल्याची ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादीनुसार त्यांनी घरासमोर उभी केलेली (एम.एच.३७ पो.०५९५) दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. या गाडीची किंमत ३५ हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरविली. त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पंडीत यादव लबडे व सुनील गोविंदा लबडे या चोरट्यांना मुद्देमालासह गजाआड केले. सदर कारवाई ठाणेदार योगिता भारव्दाज यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.