बुलडाणा - डुकराला धडक दिल्याने दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. शहरातील हाजी मलंग बाबा दर्ग्यासमोर बुधवारी (१४ ऑक्टोंबर) ही घटना घडली. स्वप्नील चंदन हिवाळे (वय २५), दिलीप संपत इंगळे (वय ४५) अशी मृतकांची नावे असून, तेजस अशोक जाधव (वय २५) गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळ्या सुमारास स्वप्नील तेजससोबत येळगावरुन बुलडाण्याकडे पल्सर दुचाकीने येत होता. चिखली मार्गावरील हाजी मलंग बाबा दर्ग्यासमोर दिलीप संपत इंगळे हे रस्त्याच्या कडेला आपली दुचाकी लावुन खरेदीला गेलेल्या पत्नी संगिता इंगळे यांची प्रतिक्षा करत उभे होते. यावेळी भरधाव येणाऱ्या या दुचाकी स्वारांनी रस्त्याच्या मध्ये आलेल्या डुकराला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दिलीप इंगळे यांना धडकली.
हा अपघात ऐवढा भीषण होता की, दिलीप इंगळे आणि स्वप्नील हिवाळे हे दोघेही ठार झाले आणि डुकरानेही आपले प्राण सोडले तर तेजस जाधव गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतकांचे शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले तर जखमी झालेल्या तेजसला उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.