वाशिम - विविध प्रलंबित मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रिसोड येथील महावितरण कार्यलयाच्या गेटला हार घालत गांधीगिरी आंदोलन केले. जिल्ह्यातील तोडलेला वीजपुरवठा त्वरित जोडण्यात यावा तसेच सक्तीची वीजबिल वसुली बंद करावी, कृषी पंपाची थकबाकी 100 टक्के माफ करावी या सर्व मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
महावितरण कंपनीकडून सक्तीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. एका बाजूला सरकारने अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही, असे सांगितले. मात्र दुसऱ्या बाजूला महावितरण कंपनी सक्तीने वीज कनेक्शन तोडत आहे. लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल तत्काळ माफ झाले पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल माफी देऊन त्यांचे कनेक्शन तोडणे तत्काळ थांबले पाहिजे आणि त्यांना हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची सुविधा मिळाली पाहिजे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेऊन कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी दिला आहे.
हेही वाचा - एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण