वाशिम - उन्हाळ्यात सर्वत्र थाटण्यात येणाऱ्या रसवंती उद्योगावर सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे गदा आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रसवंतीसाठी उत्पादित केलेला ऊस शेतातच वाळून जाण्याच्या मार्गावर आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहकाराच्या माध्यमातून यावर नामी उपाय शोधला आहे.
शेतात उभ्या असलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी रिसोड तालुक्यातील सवड येथील हरिभाऊ गाडे, संतोष लाटे, सतीश सोनुने, गजानन लाटे या चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या उसापासून गूळनिर्मितीचा उद्योग सुरू केला आहे.
कोरोनाच्या संकटाने सर्वत्र जनजीवन प्रभावित झाले असून जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी या आपत्तीमुळे पुरता हैराण झाला आहे. कायम संकटावर मात करणे अंगवळणी असलेला शेतकरी मात्र या संकटाने खचून न जाता त्यावर मात करण्यास सज्ज झाला आहे.
उन्हाळ्यात सर्वत्र आल्हाददायक उसाच्या रसाची मागणी असते. यामुळे रिसोड तालुक्यातील अनेक शेतकरी उसाची लागवड करतात. यावर्षी टाळेबंदीमुळे रसवंती उद्योग बंद पडला आहे. शेतात उभ्या असलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सवड येथे उसापासून गूळनिर्मिती सुरू केली आहे.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या गुऱ्हाळात दिवसाकाठी 15 क्विंटल गुळाचे उत्पादन होत आहे. कुठल्याही रसायनाशिवाय पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने निर्माण करण्यात आलेल्या या गुळास ग्राहकांकडून विशेष मागणी होत आहे. याच माध्यमातून परिसरात अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.