वाशिम - दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या प्रजन्यमानामुळे जिल्ह्यातील दुष्काळ अधिकच तीव्र होत चालला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळ हद्दपार करायचा असेल तर जलसंधारणाच्या कामासोबतच झाडे लावणे गरजेचे आहे. कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर श्रमदानातून कामे सुरू आहेत. या कामात आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी भरारी स्पोर्ट्स अकादमीच्या 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 400 खड्डे तयार केले आहेत. त्यांच्या या कामाचं कौतुक केले जात आहे.
उंबडॉबाजार येथे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धे अंतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून विविध जलसंधारणाची कामे युध्द पातळीवर राबवण्यात येत आहेत. कारंजा येथील पराग गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात भरारी स्पोर्टस् अकादमीच्या ८० सदस्यांनी श्रमदानाच्या आणि वृक्षारोपणाच्या कामासाठी सक्रिय सहभाग घेवून ४०० खड्डे तयार केले.
श्रमदानाचे काम करतांना भरारी स्पोर्टस् अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसुन येत होता . श्रमदानाचा परिसर " जल है तो कल है " , " एकच क्रांती जल क्रांती ", आदी घोषणानी दणाणून गेला होता . श्रमदात्यांसाठी उंबडॉबाजार वॉटर कप समिती कडून स्वादिष्ट नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती .