वाशिम - मालेगाव येथील बाल शिवाजी विद्यालयाने ‘मतदान करा’ हा संदेश मानवी साखळीद्वारे रेखाटून लोकांना मतदानाचे आवाहन केले आहे. यामध्ये विद्यालयाचे १८० विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनीही असाच संदेश रेखाटला आहे.
मालेगाव येथील बाल शिवाजी विद्यालयाबरोबरच सौ. सुशीलाताई जाधव विद्या निकेतन या शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून ‘मतदान करा’ हा संदेश दिला आहे. ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. शिक्षण विभागामार्फत आतापर्यंत चित्रकला, रांगोळी, घोषवाक्य स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर प्रभात फेरीद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
हेही वाचा- जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नागरिक सुखावले; शेतकरी मात्र चिंतेत