वाशिम - जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. वाशिम शहरातही कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येत आढळत आहेत. आज आज वाशिम पोलिसांनी बागवानपुरा जवळील खाटीकपुरा परिसरात काही दुकानावर गर्दी होत असल्याने पोलिसांनी गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला असता काही विघ्नसंतोषी लोकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.
वाशिम शहरात कोरोनाच्या रूग्णामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे काही परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. बागवानपुऱ्याजवळील खाटीकपुऱ्यात काही दुकाने सुरू होती. नागरिक देवाण घेवाणासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून आले. ती गर्दी हटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता, मात्र काही विघ्नसंतोषी नागरिकांनी उलट पोलिसांवरच दगड फेक केली. त्यामुळे काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा - वाशिम : विनाकारण फिरणाऱ्या 300 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई
पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.पवनकुमार बनसोड , वाशिम शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगिता भरद्वाज यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला असून व नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या लढाईत चार महिन्यापासून पोलिस नागरिकांसाठी अहोरात्र लढत आहेत. गर्दीमुळे नागरिकांना धोका आहे. मात्र काही विघ्नसंतोषी नागरिकांमुळे विपरीत घटना घडत आहेत.