वाशिम - कोरोनाला हरवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना पुढे सरसावल्या आहेत. कोरोनाबद्दलच्या जनजागृतीसाठी आणि घरी विरंगुळा मिळावा, यासाठी वाशिम येथील संस्कृती फाऊंडेशन आणि रिसोड पत्रकार संघाच्या वतीने रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात चित्रकला स्पर्धेत 134 तर रांगोळी स्पर्धेमध्ये 192 कुटुंबांनी सहभाग घेतला.
हेही वाचा... नशेसाठी संचारबंदीचे उल्लंघन पडले महागात, गावकऱ्यांनी दिला चोप
स्पर्धकांना 'घरी रहा, सुरक्षित रहा' हा चित्रकला आणि रांगोळीसाठी विषय देण्यात आला होता. तब्बल 192 कुटुंबातील सदस्य या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धकांनी आपल्या कलेतून घरी रहा, सुरक्षित रहा हा संदेश अतिशय कल्पकतेने साकारला. काढलेली चित्रे, रांगोळ्या सोशल मीडियाद्वारे आयोजकाना पाठवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन संपल्यावर विजेत्यांना पारितोषिक दिले जाणार आहेत. ही चित्रकृती आणि रांगोळ्या सर्वांसाठी सोशल मीडियावर उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.