वाशिम - पश्चिम वऱ्हाडतील नगदीचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या कापणी हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा अतिवृष्टीचा विपरीत परिणाम खरिपाच्या हंगामावर दिसून येत असून हाती आलेल्या पीकाची कापणी करून ते सुरक्षितपणे घरी नेण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
वाशीम जिल्ह्यात खरिपाचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या कापणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. सोयाबीनची कापणी ही पारंपरिक पद्धतीने होत असून या माध्यमातून मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. सर्वत्र एकाच वेळी कापणीला सुरुवात होत असल्याने मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचा विपरीत परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला असून अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन हाती येणार असल्याची शक्यता आहे.
यावर्षी कोरोनाचे संकट पाहता सर्व क्षेत्रांमध्ये नुकसानीला तोंड द्यावे लागले. शेती वर सर्व भिस्त असलेल्या शेतकऱ्यांना शेतीपिकाची शाश्वती होती. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतीवर मोठी आशा होती. अशातच दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनचे पीक रोगाचा प्रादुर्भाव पाहता हातचे गेल्याचे चित्र निर्माण झाले.
अनेक शेतकऱ्यांनी शेतावर नांगर फिरवला, गुरेढोरे घातली, शासनाकडून याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. यात कसेबसे थोड्या फार उत्पन्नाची आशा असलेल्या काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी सुरू केली आहे. मात्र काही भागात पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यावर्षी कापणी काढणीचा खर्च निघेल की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.