वाशिम - विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र डव्हा येथील श्री नाथनंगे महाराज यात्रामहोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. मात्र जरी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी देखील महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी कोरोनाचे नियम पाळून या महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वयंसेवकांनी शिस्तबध्द नियोजन करून महाप्रसादाचे वाटप केले.
रथसप्तमीच्या दिवशी सुर्योदयाच्या मंगल प्रहरी प. पु. विश्वनाथ महाराज व प. पु. नाथनंगे महाराज यांच्या समाधीस्थळी विधीवत पुजन करून आरती करण्यात आली, व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन भाविकांकडून करण्यात आले, मास्क सॅनिटायझर, तसेच योग्य सामाजिक अतंर राखून भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. तब्बल 31 क्विंटल बुंदीच्या प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले.
दरवर्षी असे होते महाप्रसादाचे वाटप
माहाराजांच्या महाआरतीनंतर ८ एकर शेतात ५0 ट्रॅक्टरमधून २ हजार ५00 स्वयंसेवक भाविकांना महाप्रसादाचे वितरण करतात. पिण्याच्या पाण्यासाठी 6 टॅंकरची व्यवस्था करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घालण्यात आल्याने हा सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजार करण्यात आला. यावर्षी दुकाने आणि सिनेमागृहे यांना देखील परवानगी नाकारण्यात आली होती.