वाशिम - जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. या तुलनेत औषधांचा साठा कमी आहे. प्रत्येक 300 रूग्णांना 600 रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे. मात्र, वाशिममध्ये या इंजेक्शनचा तुटवडा आहे. सध्या वाशिममध्ये अकोला येथून इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याने 10 टक्केच इंजेक्शन मिळत आहेत. त्यामुळे रूग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचे अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक म्हणतात साठा आहे -
या रेमडेसिविरचे इंजेक्शनची 900 ते 1 हजार 300 या दराने विक्री केली जात आहे. इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रूग्णांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र, जिल्हा आरोग्य केंद्रात रूग्णांना लागेल त्या अनुषंगाने रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी फोनवरून दिली.
रेमडेसिविर इंजेक्शन हे 2014 मध्ये इबोला व्हायरसच्या उपचारावर हे औषध वापरण्यात आले होते. हे औषध इन्ट्राव्हेन्स म्हणजेच शरीराच्या नस(शीर)मध्ये देण्यात येतो. हे औषध कोरोना रूग्णांवर देखील फायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यानंतर कोरोना रूग्णांना देखील दिले जात आहे. एका गंभीर रूग्णाला कमीत कमी 6 ते 12 इंजेक्शनचा डोस द्यावा लागतो. मात्र, इंजेक्शनचा तुटवडा असल्याने दोन डोसवरतीच काम चालवावे लागत आहे.
हेही वाचा - उद्रेक.. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर, २७७ जणांचा मृत्यू