वाशिम - रिसोड तालुक्यातील देगाव येथील शेत शिवारात असलेल्या दोन घरातून सशस्त्र दरोडा टाकून 2 लाख 78 हजार तीनशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 10 ऑगस्टला रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. घटनेनंतर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
देगाव शेत शिवारातील शेतात दत्त मंदिराचे बाजुच्या घरात मंदिराचे पुजारी राहतात. ते कुटुंबियांसह जेवण करताना अचानक सहा चोर हे एका पाठोपाठ घरात घुसले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यांचे हातात चाकू, रॉड, काठ्या होत्या. या चोरट्यांनी घरात प्रवेश करताच मारहाण सुरू केली. घरातील एका महिलेच्या हातात असणाऱ्या 20 तोळ्याच्या चांदीच्या पाटल्या हातातून काढून घेतल्या. गळ्यातील साधी पोत, गळ्यातील एकदाणी व एक पिवळ्या डिस्को मण्याची पोत ही गळ्यातून ओढून घेतली. तसेच लॉकरमधील सुमारे 44 हजार रुपयांची किंमत असलेला मोबाईल चोरला.
यापूर्वी या चोरट्यांनी गजानन महाराज मंदिराच्या खोलीत राहणारे कुंडलीक गायकवाड यांच्या घरीही अशाच प्रकारे चोरी केली आहे. त्यांच्या घरातील सोन्याचे दागीने व 500 रूपये रोख रक्कम, असा एकूण एक लाखांचा मुद्देमाल चोरी केला आहे. दोन्ही चोरीत एकूण 2 लाख 78 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - पंचाहत्तरीतील 'रँचो' आजोबा: सायकलला जुगाड करून केली ई-सायकल तयार