वाशिम - नागपूर-मुंबई महामार्गावर रिक्षाचा अपघात झाला. यात 16 वर्षीय अंकीत मसवडकर हा युवक जखमी झाला. मात्र, अपघातग्रस्तांसाठी वेळेवर रुग्णवाहिका न पोहचल्यामुळे अंकीतचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेलूबाजार येथील नागरिकांनी नागपूर-मुंबई महामार्गावर रास्ता रोको करत आंदोलन केले.
नागपूर-मुंबई महामार्ग शेलूबाजार गावातून जातो. महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असल्याने नेहमीच अपघात होतात. तर कधी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे हा महामार्ग गावाच्या बाहेरुन काढावा, यासाठी गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला निवेदने दिलीत. मात्र, त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिल्या गेले नाही. दरम्यान, याच मार्गावर मंगळवारी रिक्षाचा अपघात झाला. अपघातग्रस्तांना वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नागिरकांनी रास्ता रोको आंदोलन केले. परिणामी काही काळ वाहतूक ठप्प झाली.