वाशिम - कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस आहे. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कारगिलच्या युद्धात वाशिमचे कॅप्टन (निवृत्त) साईदास वानखेडे यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनी या युद्धासाठी लागणारे बोफोर्स तोफांसाठी लागणारा अॅमिनेशन वर्ध्या जिल्ह्यातील पुलगाव येथून रेल्वेने कारगिलपर्यंत पोहोचवले होते.
कॅप्टन साईदास वानखेडेंचा अनुभव -
1999मध्ये जेव्हा कारगिलचे युद्ध सुरू झाले तेव्हा मी पुलगाव येथे कार्यरत होतो. युद्धासाठी जे काही आवश्यक होते ते येथून कारगिलला घेऊन जायची जबाबदारी माझ्याकडे होती. युद्धाच्या सुरुवातीपासून विजयाचा ध्वज फडकेपर्यंत 2 महिन्यांपर्यंत प्रत्येक वेळी रेल्वेच्या सुमारे 60 बोगी बोफोर्स तोफांसाठी लागणारा अॅमिनेशन पुलगाववरून घेऊन माझ्याबरोबर 114 सैनिक आम्ही कारगिलला घेऊन जात होतो.
पुलगावहून अॅमिनेशन घेऊन निघालेल्या या रेल्वेकडे दहशतवादी लक्ष ठेऊन होते. आमच्या या रेल्वेवर अनेक ठिकाणी गोळीबार करत होते. मात्र, या गोळ्यांचा आमच्या ट्रेनवर कोणताही परिणाम झाला नाही आणि आमची रेल्वे कुठेही न थांबता पठाणकोटवर पोहोचायची. तेथून आम्ही ट्रकने सर्व साहित्य कारगिलपर्यंत घेऊन जायचो. मात्र, श्रीनगरपासून ते कारगिलपर्यंतचा खडतर रस्ता आजही डोळ्यासमोर येते.
हेही वाचा - KARGIL VIJAY DIWAS पाकिस्तानी घुसखोरीचा भारताने असा केला होता पर्दाफाश
मी 30 वर्षाची सैन्यदलात सेवा बजावली. त्यामध्ये 20 वर्ष काश्मीरमध्ये सेवा दिली. तर जवळपास अडीच वर्ष मी या युद्धामुळे घरी गेलो नाही. हे युद्ध आम्हाला जिंकायचे होते. तसेच आमचा विजयसुद्धा झाला, असे त्यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.