वाशिम - कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यातही खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिक विनाकारण मास्क न लावता बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चेहऱ्यावर मास्क न लावता शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले, ३ मे पर्यंत लॉकडाऊनही वाढवण्यात आले. मात्र, काही मुजोर नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरून संचारबंदीचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने आजपासून मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. काम नसताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले देण्यात आले आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडणाऱ्या वाशिमकरांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.