वाशिम - लग्नसमारंभ, राजकीय मेळावे व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मार्च ते जून या चार महिन्यांत छायाचित्रणाचा हंगाम असतो. मात्र,कोरोनामुळे या हंगामावर संकट आले आहे. वाशिम जिल्ह्यातील व्यावसायिक छायाचित्रकारांचे काम बंद असल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे अमर रोकडे यांचा अमर फोटो स्टुडिओ आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये, पण एखाद्या कार्यक्रमात फक्त पाच जणांना परवानगी असल्याने रोकडे यांना छायाचित्रणासाठी कोणीच बोलवत नसल्याचे चित्र आहे. सांस्कृतिक कार्यक्रमही नसल्याने छायाचित्रकारांकडे कामेच नाहीत. पिककर्ज, स्कॉलरशिपसाठी लागणारे फोटो काढण्यासाठी सुद्धा कोणीच येत नसल्यामुळे रोकडे यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सगळेच काम ठप्प असून वर्षभर काम मिळविण्यासाठी आता छायाचित्रकारांवर वाट पाहण्याची बिकट वेळ आली आहे. छायाचित्रकारांबरोबरच ग्राफिक डिझायनर, फोटो एडिटर यांचे नुकसान झाले आहे. त्यातच कोरोना आजारामुळे यावर्षीचा हंगाम गेला आहे. यामुळे छायाचित्रकार आर्थिक संकटात आले असल्याचे छायाचित्रकार अमर रोकडे यांनी सांगितले.