वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला. २३ मे रोजी त्यासंदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला. यामुळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मोफत उपचार घेता येणार आहेत.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत १ हजार २०९ उपचार पुरविले जातात. या अंतर्गत राज्यातील सुमारे ८५ टक्के लोकसंख्येचा समावेश होतो. तर, राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील नागरिकांनासुद्धा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय ९९६ उपचार पद्धतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ३१ जुलैपर्यंत ही योजना अंमलात राहील. त्यानंतर त्याबाबत आढावा घेऊन मुदतवाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यात करोनाच्या रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन आगामी काळात खाटा कमी पडू नयेत. तसेच, करोना नसलेल्या रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावे, यासाठी सर्वच नागरिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र अथवा १५५३८८ किंवा १८०० २३३ २२०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शासकीय रुग्णालयांकरिता राखीव १२० उपचार आता मिळणार खासगी रुग्णालयात -
शासकीय रुग्णालयांकरीता राखीव असलेल्या १३४ उपचारापैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता १२० उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये ३१ जुलैपर्यंत मान्यता प्राप्त दराने करण्यात येतील. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत उपलब्ध नसलेल्या काही किरकोळ व मोठे उपचार आणि काही तपासण्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना सीजीएचएस, एनएबीएच/एनएबीएलच्या दरानुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांच्यामार्फत करण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी, केशरी, पांढरी शिधापत्रिका, तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करावा लागेल. त्याबरोबरच आधारकार्ड अथवा शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. कोरोनाच्या साथीचे गांभीर्य आणि उपचाराची निकड पाहता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबत शिथिलता देण्याचे अधिकार राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
योजनेसाठी अंगीकृत असलेली जिल्ह्यातील रुग्णालये -
शासकीय रुग्णालये (३) : जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम, उपजिल्हा रुग्णालय, कारंजा लाड, ग्रामीण रुग्णालय, मंगरूळपीर.
खासगी रुग्णालये (१०) : बिबेकर हॉस्पिटल, देवळे हॉस्पिटल, कानडे बालरुग्णालय, माँ गंगा बाहेती रुग्णालय, डॉ. व्होरा हॉस्पिटल, लाइफलाइन हॉस्पिटल, वाशिम क्रिटिकल केअर, लोटस हॉस्पिटल, बाजड हॉस्पिटल व प्रसूतिगृह, गोल्डन सेकंड इनिंग खराट बालरुग्णालय (सर्व वाशिम).