वाशिम - जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून ही बाब उघडकीस आली होती. रुग्णालयात सफाई काम करणाऱ्या एका महिलेने रुग्णाला इंजेक्शन दिल्याचे समोर आले. तेथील रुग्णांना याबाबत विचारले असता, त्या महिलेकडून असे अनेकदा इंजेक्शन दिले असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा... तुकाराम मुंढे यांच्यामुळे नागपूर मनपाची विशेष सभा रद्द, वाचा कारण...
या व्हिडिओत सफाई कर्मचारी महिला इंजेक्शन देत असताना, सोबत एक महिला परिचारिका देखील उपस्थित आहे. मात्र तिने या महिलेला कोणताही अटकाव केला नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय येथील रुग्णांच्या जीवासोबत खेळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकारामुळे रुग्ण आणि नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सर्व सामान्य जनतेला परवडणारे आणि सोईचे असलेल्या जिल्हा रुग्णालयातच असा जीवघेणा प्रकार होत असेल, तर रुग्णांनी कुठे जायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने निष्काळजी कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा... भय इथले संपत नाही... नागपुरात 'निर्भया'ची पुनरावृत्ती?
दरम्यान जिल्हा रूग्णालय प्रशासनाचे अधिकारी अंबादास सोनटक्के यांनी, सदर सफाई कर्मचारी महिलेला कामावरून काढून टाकल्याची माहिती दिली. तसेच त्यावेळी कामावर उपस्थीत असणाऱ्या परिचारिकांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.